४६. बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल, पाचोरा येथे विज्ञान प्रदर्शन २०२६ उत्साहात संपन्न.

पाचोरा, दि. १६ फेब्रुवारी २०२६ : बुरहानी इंग्लिश मिडियम स्कूल, पाचोरा (नवीन इमारत) येथे शाळेचे वार्षिक विज्ञान प्रदर्शन २०२६ मोठ्या उत्साहात, शैक्षणिक वातावरणात आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात पार पडले. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे, प्रयोगातून शिक्षण देणे, कल्पनाशक्ती वाढवणे व आत्मविश्वास निर्माण करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता.

शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एस. एस. एम. एम. कॉलेज चे उपप्राचार्य डॉ. डब्ल्यू. एस. वले , प्राध्यापक श्री. शरद पाटील, डॉ. प्रशांत सांगडे – एम.डी. होमिओपॅथी ओम साई क्लिनिक पाचोरा, न्यू बुरहानी इंग्लिश मिडीयम स्कूल चे मुख्याध्यापक श्री. डी. पी. देवरे, भडगाव इंग्लिश मिडीयम स्कूल चे मुख्याध्यापक श्री. शर्मा सर आणि शिक्षक श्री. राकेश पाटील, स्वामी लान्स चे संस्थापक श्री. दत्ता भाऊ सोनार, पालक शिक्षक संघ सदस्य श्री. किशोर डोंगरे  हे मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनामध्ये इयत्ता १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित आकर्षक व उपयुक्त प्रकल्प सादर केले. लहान विद्यार्थ्यांनी स्वतः मॉडेल्स तयार करून त्यांच्या कार्यपद्धतीचे सोप्या भाषेत सादरीकरण केले. यामध्ये सौरऊर्जा निर्मिती, पाणी बचत व जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन, पुनर्वापर (Recycle), प्रदूषण नियंत्रण, आरोग्य व स्वच्छता, वाहतूक नियम, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, पावसाचे पाणी साठवण, मानवी शरीर रचना, स्मार्ट सिटी संकल्पना यांसारख्या विषयांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पांचे स्पष्टीकरण देताना कारण-परिणाम संबंध, उपयोग आणि दैनंदिन जीवनातील महत्त्व स्पष्टपणे सांगितले. लहान वय असूनही विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, संवादकौशल्य व सादरीकरण शैली पाहून उपस्थित पालक व नागरिक आश्चर्यचकित झाले. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांच्या तयारीचे व शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे विशेष कौतुक केले.

मान्यवरांनी प्रदर्शनाला भेट देऊन प्रत्येक प्रकल्पाचे बारकाईने निरीक्षण केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत मार्गदर्शन केले की, “अशा प्रकारचे प्रयोगाधारित शिक्षण विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देणारे आहे. भविष्यातील डॉक्टर, अभियंते, संशोधक आणि वैज्ञानिक घडविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.”

प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. पालकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना दिली. संपूर्ण शाळा परिसरात शैक्षणिक आणि वैज्ञानिक वातावरण निर्माण झाले होते. लहान मुलांच्या उत्साहामुळे प्रदर्शनाला जत्रेसारखा आनंददायी माहोल प्राप्त झाला.

शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी आवड निर्माण झाली असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल असे शाळेच्या वतीने सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page